वर्धा | आजपासून ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. मात्र या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला.
या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभामंडपात गोंधळ निर्माण झाला. या आंदोलकांची दखल मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या भाषणात घेतली.
हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, तुम्ही गोंधळ घालू नये असेदेखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
गोंधळ करणाऱ्या आंदोलकांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. विदर्भावर उर्जा, पाणी, निधी प्रत्येक गोष्टीत अन्याय होतो असं आंदोलकांचं म्हणणं होतं. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.