ग्रामीण भागात नजर काढताना ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ स्त्रियांना असं म्हणताना तुम्ही एकल असेल. प्राचीन भारताच्या इतिहसानुसार बळी हा सदगुणी, प्रजाहितदक्ष, दानशूर आणि सामर्थ्यशाली राजा होता. त्याच्या काळात राज्यात सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी नांदत होती. बळीराजाला लोक खूप मान देत आणि त्याचा आदर करत. त्याच्या चांगुलपणाची कीर्ती तर तिन्ही लोकांत पसरली होती. स्वर्गातील देवांना सुद्धा त्याच्या या लौकिकाचा हेवा वाटायला लागलेला. यामागे एक कारण होते बळी हा दैत्यांचा वंशज होता. तो हिरण्यकश्यपचा पणतू तर भक्त प्रल्हादचा नातू होता.
एका दानवाची कीर्ती, राजा इंद्राच्या पुढे जाने देवांना सहन झाले नाही. बळी राजाला मार्गी लावण्यासाठी सर्व देव विष्णूकडे गेले. विष्णूने देवांची ही विनंती मान्य केली. बळीराजाकडून त्याचे राज्य काढून घेण्यासाठी विष्णुदेवाने एक युक्ती केली. त्यांनी वामनाचे रूप धरण केले आणि बळीराजाकडे ‘मला पाय ठेवायला फक्त तीन पावलं जमीन पाहिजे,’ अशी मागणी केली. यावेळी बळीचे गुरु शुक्राचार्य यांनी त्याला समजावले की ही एक माया आहे व हे दान नको करूस पण तरीही क्षत्रीय धर्म पाळत त्याने वामनरूपातील विष्णूला वचन दिले. पुढच्याच क्षणी वामनाने आपले भव्य रूप प्रकट केले. एका पायाने त्याने स्वर्गलोक व्यापला, दुसरे पाऊल पृथ्वीवर टाकले. तिसर्या पाऊलासाठी कुठेच जागा न राहिल्याने बळीने स्वतःचे मस्तक पुढे केले. वामनरूपातील विष्णूने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळ लोकात पाठवले.
मात्र धर्मवीर बळी राजाची भक्ति आणि सेवा पाहून विष्णूदेव भारावून गेले त्यांनी बळीराजाला दोन वर दिले. एक- त्याला पाताळलोकाचा राजा घोषित केले व त्याच्या दरबारात द्वारपाल होण्याचे काम विष्णूने स्वीकारले. तसेच बळीचे त्याच्या जनतेवर असलेले प्रेम लक्षात घेऊन त्याला वर्षांतून एकदा पृथ्वीवर जाऊन प्रजेला भेटण्यास परवानगी सुद्धा दिली. त्यामुळे तिरूओणमच्या दिवशी बळीराजा आपल्याला भेटायला येतो या समजुतीने केरळचे लोक आनंदोत्सव साजरा करतात. ‘आम्ही तुझ्या राज्यात सुखी, आनंदी आहोत, आमची भरभराट झाली आहे,’ हे दाखवत हसत मुखाने ओणम सण मल्याळी लोक साजरा करतात.
काही लोक बळीराजाच्या या गोष्टीचा विरोध करतात. बळी राजा दानव होता आणि तो जनतेचा छळ करायचा आणि त्यामुळेच विष्णुदेवाने तत्याला पाताळात धाडले असं सांगतात. तसेच शेतकर्याचा बळीराजा हा राजा बळी नसून श्रीकृष्णाचा भाऊ बलराम आहे असे सुद्धा संगितले जाते. काहीही असो भारतात ओणम सारखे सुंदर सण साजरे होतात, लोक एकत्र येतात आणि समाजात बांधिलकी वाढते. हे जास्त महत्वाचे.
राख्यांनी बाजारपेठ सजली