२०१५ साली केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण देशात सुरु केली. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींना उच्च शिक्षण मिळावे, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहून स्वावलंबीपणे आयुष्य जगता यावे तसेच भारताच्या लेकींना खर्या अर्थाने समृद्ध करणे हा आहे. आज फॉर द पीपल च्या माध्यमातून आपण सुकन्या समृद्धी योजना काय आहे आणि तिचा कसा लाभ घेता येईल हे पाहणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना ही एक लघु बचत योजना आहे जी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मुलींचे पालक किंवा त्यांचे कायदेशीर संरक्षक मुलींच्या नावाने बचत खाते उघडण्याची तरतूद आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मुलींच्या भविष्यात येणार्या तडजोडीसाठी एक ठराविक रक्कम जमा करता येते. हे बचत खाते उघडण्यासाठी लाभार्थी मुलीची वयोमर्यादा 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावी लागते. हे बचत खाते देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा निवडक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाऊ शकते.
या बचत योजनेत वार्षिक किमान २५० रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची बचत करण्याची सोय आहे. मुलिंच्या पालकाने हि किमान ठराविक रक्कम भरणे आवश्यक आहे, अन्यथा बचत खाते बंद पडण्याची शक्यता असते. सरकार या गुंतवणुकीवर ८ टक्के दराने लाभार्थ्यांना व्याज देते. एखाद्याने जर या योजनेत दर महिन्याला १० हजाराची गुंतवणूक केली तर त्याच्या खात्यात १५ वर्षात ४० लाखांपर्यंत रक्कम जमा होऊ शकते. या योजनेचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे योजनेंतर्गत आयकर सूट सुद्धा दिली जाते.
मुलगी १८ वर्षांची झाल्याशिवाय या खात्यातून पैसे काढता येत नाहीत, शिवाय मुलगी १८ वर्षांची झाल्यावर सुद्धा फक्त ५० टक्के रक्कमच काढता येते. सगळे पैसे काढण्यासाठी आणि योजनेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी मुलीचे वय किमान २१ वर्ष असणे आवश्यक आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत एका कुटुंबातील केवळ दोनच मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेमागे मुलींनी शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करावी, लग्नासाठी पैसे कमी पडू नयेत, देशातील मुलींना प्रोत्साहन मिळावे आणि स्त्री-भ्रूणहत्या थांबल्या जाव्यात असे भारत सरकारचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.