लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपनं तीन दिवसांपूर्वी १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. मात्र यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागण्यांमुळे जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. मित्रपक्षांना कमीतकमी जागा देऊन अधिकाधिक जागा स्वत: लढवण्याची तयारी भाजपनं केली आहे. लोकसभेत मित्रपक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार नाही. त्याबद्दल शिंदेसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केलेला आहे. रामदास कदम, गजानन किर्तीकर यांना भाजपच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी बोलून दाखवली आहे.भाजपा अधिकाधिक जागा लढण्यावर ठाम आहे..त्यामुळं याचा शिंदेंना सर्वात मोठा फटका बसू शकतो.जागा वाटपावरून शिंदे-भाजपमध्ये जुळून येत नसल्याच्या जोरदार चर्चा आहेत…सध्या सुरु असलेल्या चर्चेनुसार.. भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा सोडण्याच्या तयारीत आहे. भाजपकडे ३२ तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ ७ जागा देण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जातंय. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं २३ जागा लढवल्या. त्यापैकी १८ जागा जिंकल्या. या १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदेंसोबत गेले. पण भाजपनं शिंदेंना ७ जागा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं शिंदेंच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला जाऊ शकतो.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेत जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात आला का ? नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.. मात्र भाजप जिथं खात्री आहे तिथं लढवण्यावर ठाम आहे. परंतु एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कमी जागांवर तडजोड करण्यास तयार नाही.त्यामुळं महायुतीत जागावाटपावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही..