मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुन्हा एकदा विद्यमान खासदारालाच उमेदवारी देणार असल्याचे संकेत आहेत, तर दुसरीकडे महायुतीमध्ये या जागेवरून खलबतं सुरू आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ होता. भाजपाची वैचारिक पायाभरणी करणारे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे असे खासदार निवडून आणलेला भाजपच्या वैभवशाली परंपरेचा वारसा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे.त्यामुळेच भाजपचा वैचारिक पाया रचणाऱ्या नेत्यांना घडवणारा मतदारसंघ हा आपल्याकडे असावा अशी इच्छा भाजपची आहे.१९९६ साली युतीच्या जागावाटपात बाळासाहेब ठाकरेंनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी मागून घेतला. तोपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे होता. त्यानंतर १९९६ ते २००९ या काळात शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे खासदार होते. पुढे २०१४ ते २०१९ दोन वेळा शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार झाले. ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. त्यापैकी सद्य स्थितीला ठाण्यात संजय केळकर हे भाजपचे आमदार आहेत. ओवळा-माजिवडा या मतदार संघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे आहेत. कोपरी पाचपखाडी मतदार संघाचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मीरा भाईंदर या मतदारसंघात अपक्ष आमदार गीता जैन आहेत. ऐरोलीमध्ये भाजपाचे गणेश नाईक आमदार आहेत. तर बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार भाजपचे असल्याने या जागेवर भाजपचा डोळा आहे. तर दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी भाजपकडून खेचून आणलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाही, या भूमिकेत एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे; मात्र या जागेवरून दोन्ही पक्षात ‘तह’ होण्याची शक्यता असल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांची चिंता वाढलीय…