जळगाव | भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
त्यांनी बोलताना, विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा हिशेब मागितला जातो पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की, मोदी हे पंतप्रधान होऊन १० वर्ष झाली आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार वाहतेय. तुम्ही त्या ५० वर्षांचा सोडा, फक्त पाच वर्षांचा तरी हिशेब जनतेला द्या अशा शब्दांत शाह यांनी पवारांना लक्ष्य केलं आहे.
अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकताना आपल्या पहिल्याच सभेत पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फटकारलं.
तुमच्यासाठी कोणी असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी!
ज्या पक्षांमध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहेत हे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का? काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आपला मुलगा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे, ममता बॅनर्जींना आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. मग या सगळ्या नेत्यांपैकी तुमच्यासाठी कोण आहे? तुमच्यासाठी कोणी असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत असं अमित शाह म्हणाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसमोर लोकसभा निवडणुकीत आव्हान उभं केलं आहे. राज्यात महाविकास आघाडीची तीन चाकी पंक्चर रिक्षा आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार या निमित्ताने भाजपकडून करण्यात येत आहे. भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोहचवण्यासाठी भाजपला साथ द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केलं आहे.