सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी रंगल्याचं पहायला मिळतंय. अनेक ठिकाणी जाऊन नरेंद्र मोदी, अमित शहा हे स्थानिक विरोधकांना आव्हान देताना पहायला मिळतायेत. तर अनेक थेट मोदी-शहांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिसतायेत. अशातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी थेट भारतीय जनता पक्षाला आव्हान दिलंय. ‘कायमस्वरुपी भारतीय जनता पक्ष सत्तेत राहणार नाही, आज नाही तर उद्या मी बदला जरूर घेणार’ असं म्हणत ममता बॅनर्जींनी थेट भाजपवर निशाणा साधलाय.
बंगालमधील हल्दिया येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचा बदला घेण्याची धमकी दिली. नंदीग्राममध्ये आपला पराभव करण्यासाठी निवडणूक निकाल बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मी आज ना उद्या बदला घेईन. भाजप, ईडी, सीबीआय सदैव तिथे राहणार नाही.” असं यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या.
पुढे बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी तुम्हाला विधानसभा निवडणुकीदरम्यान नंदीग्राम घटनेबद्दल आधीच सांगितले आहे, माझी फसवणूक करून मला त्रास देण्यात आला. माझी मते लुटली गेली आणि निकालावेळी हेराफेरीही झाली. निवडणुकीपूर्वी डीएम, एसपी, आयसी बदलण्यात आले आणि निवडणुका संपल्यानंतर लोडशेडिंग करून निकाल बदलले. या सगळ्या गोष्टींचा बदला मी जरूर घेणार”असं म्हणत ममता बॅनर्जींनी आता थेट भाजपला खुलं आव्हान दिलंय.
काय आहे नंदीग्राम प्रकरण?
2 मे 2021 रोजी पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा जाहीर झाले. मैदानात भाजपचे सुवेंदू अधिकारी आणि टीएमसी नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होत्या. निवडणुकीत या व्हीआयपी जागेवर भाजप नेत्याचा विजय झाल्याचे घोषित करण्यात आले. वास्तविक ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र सायंकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा उमेदवार 100 मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. यानंतर नंदीग्राममध्ये हिंसाचार उसळला. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे.तेव्हापासूनच नंदीग्रामच्या जागेवर भाजपनं निकाल बदलल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी सातत्यानं केला आहे.