लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक १३ जागा जिंकत काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला ही जास्तीत जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी सुरु आहे. अशात नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ सुरु असल्याची माहिती समोर आली असून काँग्रेसने नागपूरवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस शह देऊ शकेल का ? नागपूरचं नेमकं गणित काय राहिलं आहे. हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि लगेचच विधानसभा निवडणुकीचं वारं वाहायला सुरुवात झाली. पण अद्याप आगामी विधानसभेची घोषणा झालेली नसली तरी आतापासूनच सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीयदृष्ट्या सर्वांगाने सर्वच पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. अशातच नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलाय. या मतदारसंघात निवडणूकपूर्व तयारीलाही सुरवात झाल्याचं काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्याची उपराजधानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं चित्र आहे. आमदार विकास ठाकरे यांच्या माहितीनुसार नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत 71 इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत.