यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत जात असल्याने काही मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळू शकते. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुक उमेदवारांमुळे तिहेरी लढत होणार असल्याची चिन्ह आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये देखील तिहेरी लढत होण्याची चिन्ह आहेत. कराड दक्षिण मध्ये कोण कोणत्या नेत्यांमध्ये हि तिरंगी लढत होऊ शकते..? हे जाणुन घेऊयात…
सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 1962 पासून या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून येत आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले मताधिक्य मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात 2014 पासून तिहेरी लढत होत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार विलासकाका पाटील उंडाळकर आणि भाजपकडून उमेदवारी मिळालेले डॉ. अतुल भोसले यांच्यात तिहेरी लढत झाली होती. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी अपक्ष उमेदवार विलासकाका पाटील उंडाळकर यांचा 16,418 मतांनी पराभव केला. विलासकाका पाटील उंडाळकर हे या मतदारसंघातून काँग्रेसकडून सलग ७ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. या मतदारसंघाप्रमाणेच सातारा जिल्ह्यात देखील त्यांचे वर्चस्व आहे. परंतु या विधानसभा निवडणूकीत पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष लढवली होती. तर भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांना या निवडणुकीत 58,621 मते मिळाली होती.
तर मागील निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा या मतदारसंघात तिहेरी लढत झाली होती. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले आणि अपक्ष उमेदवार आणि विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह विलासराव पाटील यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या अतुल भोसले यांचा 9,130 मतांनी पराभव केला. तर अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांना या निवडणुकीत 29,401 मते मिळाली होती. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार असण्याची शक्यता आहे याच कारण म्हणजे भाजपला या मतदारसंघातून मागील दोन निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवणार तसंच काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण कि रयत संघटनेचे प्रबळ नेते उदयसिंह पाटील उंडाळकर या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यास उदयसिंह पाटील उंडाळकर हे अपक्ष निवडणूक लढवतील त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा तिहेरी लढत होण्याची शक्यता अधिक आहे.