नवी दिल्ली | टोयोटाच्या लाखो ग्राहकांचा खासगी डाटा लीक झाल्याचे समोर आले आहे.(Toyota Data Leak,) याबाबतची माहिती कंपनीने माफी मागत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे.
टी कनेक्ट सेवा वापरणाऱ्या सुमारे २,९६,००० ग्राहकांची माहिती लीक झाली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने शुक्रवारी आपल्या अधिकृत वेबसाईटवर डाटा लीक झाल्याची माहिती दिली . लीक झाल्यानंतर टोयोटाने आपल्या ग्राहकांना सतर्क करण्यासाठी एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये डेटा लीक झाल्यानंतर अनेक ग्राहकांना त्यांच्या ईमेल आयडीवर स्पॅम, फिशिंग स्कॅम किंवा अनपेक्षित ईमेल संदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. असे सांगण्यात आले. यापासून सावध राहण्याचे कंपनीने आपल्या ग्राहकांना आवाहन देखील केले आहे.
दरम्यान, टोयोटाने दिलेल्या माहितीनुसार, टी कनेक्ट सेवेचा वापर करणाऱ्या एकूण २,९६,००० ग्राहकांचे ई-मेल आणि यूजर नंबर लीक झाले आहेत. टी कनेक्ट ही एक टेलिमॅटिक्स सेवा आहे जी कार आणि कारचालकाला नेटवर्कद्वारे कनेक्ट ठेवते. यालाच हॅक करून डेटा लीक झाला असावा असा अंदाज कंपनीने दर्शविला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, असे असले तरी ग्राहकांची नावे, फोन नंबर किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही संवेदनशील माहिती लीक होण्याची शक्यता नाही. कंपनीने हा दावा केला असला तरी, टी कनेक्ट सेवेमध्ये युजर्सची अनेक वैयक्तिक माहिती असते असे म्हटलं जात आहे. तरीदेखील ग्राहकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.