मुंबई | देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग एकापाठोपाठ एक मोठे करार करत आहेत. त्यांनी आणखी एक मोठी कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मन रिटेलर मेट्रो एजी कंपनीचा भारतातील व्यवसाय त्यांनी विकत घेतला आहे. हा करार २८४९ कोटी रुपयांना झाला आहे.
रिटेल क्षेत्रातील व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने अंबानींचे हे मोठे पाऊल असणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्स लवकरच मेट्रो एजीचा भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने एकूण ३४४ डॉलर दशलक्ष मध्ये मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (मेट्रो इंडिया) मध्ये १०० टक्के इक्विटी स्टेक घेण्यासाठी करार केले आहेत.
या कराराबद्दल रिलायन्स आणि मेट्रो ग्रुपमध्ये चर्चा सुरू आहे. या करारामध्ये मेट्रो कॅश अँड कॅरीच्या मालकीची ३१ घाऊक वितरण केंद्रे, जमीन, बँका आणि इतर मालमत्तांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यावेळी या कराराबाबत दोन्ही कंपन्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
दरम्यान, कंपनीने जारी केलेल्या निवेदनाप्रमाणे, RRVL सोबतचा व्यवहार मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. महत्त्वाचे म्हणजे २०२१\२२ या आर्थिक वर्षात मेट्रो इंडियाने सुमारे ७७०० कोटी रुपयांची विक्री नोंदवली होती.