मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे संघापासून दूर आहे. बीसीसीआयकडून भारताची टी-20 ची कमान हार्दिक पांड्याकडे देण्याची चर्चा सुरु आहे. असे असताना आता दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेतून बाहेर पडलेल्या रोहितला सफेद चेंडूच्या कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते.
फिटनेस आणि फॉर्ममध्ये झगडणाऱ्या हिटमॅनच्या या मुद्द्यावर बीसीसीआय गांभीर्याने विचार करत आहे. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे टी-20 आणि वनडे संघाची कमान सोपवली जाऊ शकते. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकमध्ये रोहितची कामगिरी काहीशी सरशी राहिली नाही. या दोन्ही स्पर्धेनंतर फॉर्मसोबतच त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हार्दिक पांड्या वनडे आणि टी-20 संघाचा नवा कर्णधार बनू शकतो. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकशी याबाबत बोलणे झाले असून, त्याला उत्तर देण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे. नवीन निवड समितीने पदभार स्वीकारल्यानंतर कर्णधारपदात बदल होणार हे स्पष्ट झाले आहे. रोहितचे सफेद चेंडूच्या कर्णधारपदावर आता संकट आले आहे, असे म्हणावे लागेल.