नवी दिल्ली | केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एक पत्र लिहिलं आहे. चीनमधील वाढत्या कोरोनाच्या आणि काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांना हे पत्र देण्यात आले आहे.
चीन आणि पूर्व आशियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पत्रामध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान कोरोनासंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे असं म्हटलं आहे. यात मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.
संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होता येईल. ‘नियमांचे पालन करा नाहीतर यात्रा रद्द करा’ असा थेट उल्लेख या पत्रात आहे. सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील आपत्कालीन स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेणं गरजेचं आहे, असंही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. म्हणूनच हे पत्र राजस्थानमध्ये सत्तेत असलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री गेहलोत यांनाही पाठवण्यात आलं आहे.