पुणे | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज दुपारी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठी चित्रपटसृष्टीत विक्रम गोखले यांचे नाव आदराने घेतले जात होते. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले होते. कोरोना काळात वयाची पंच्याहत्तरी असतानाही त्यांनी ‘गोदावरी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच ते स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. या मालिकेत ‘मल्हार’च्या गुरूंची भूमिका त्यांनी साकारली होती.
गोखले यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते काही दिवस व्हेंटिलेटरवर होते. वैद्यकीय उपचारांना त्यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. अखेर आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतून दु:ख व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती दिली जात आहे.