हिंगोली | शिंदे गटातील आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शासकीय अधिकाऱ्यांना अपशब्द वापरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वीज कनेक्शन तोडल्याचे समजल्यानंतर संतप्त झालेल्या बांगर यांनी कर्मचाऱ्याला थेट रट्टे देण्याची भाषा केली आहे.
आमदार बांगर हे त्यांच्या विधानामुळे सतत चर्चेत असतात. संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. यापूर्वीही त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. त्यानंतर आता बांगर यांनी वीज कर्मचाऱ्याला फोन करून दमदाटी केली आहे.
काय आहे प्रकरण?
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले होते. ही माहिती गावकऱ्यांनी आमदार बांगर यांना दिली. यावर आमदार बांगर संतापले. ‘इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन’, अशी थेट धमकीच दिली.