नागपूर | हिवाळी अधिवेशन सुरु आहे त्यामध्ये राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या जवळपास साडेचार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे.
यापूर्वी एमपीएसच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची भरती केली. आता २८ टक्के जागा रिक्त आहेत. यासंदर्भात मेडिकल बोर्ड तयार करून लवकरच पदभरती केली जाईल. एमपीएससीमार्फत जागा भरण्यास वेळ लागतो असंदेखील महाजन म्हटले. तसंच राज्यात आत्तापर्यंत १० टक्के हॉस्पिटल आणि ९० टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी केली जात होती, मात्र आता हे प्रमाण बदलून ३० टक्के हॉस्पिटल आणि ७० टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल, अशीही माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
दरम्यान, राज्यात १० हजार खोल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी बांधण्याची गरज असून आम्ही सीएसआरच्या माध्यमातुन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच २०२४ पर्यंत जे जे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करणार आहोत आणि तसेच रिचर्ड अँड क्रुडास येथील जागा जी ९९ वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत २० वर्षांपूर्वी संपली आहे. ती जागा जे.जे. ला मिळाली तर मोठा फायदा होईल. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. अपेक्षा आहे लवकरच निर्णय लागेल, असंही महाजन म्हणाले.