नागपूर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक पत्र लिहले आहे. या पत्रातून सुर्वे यांनी तृतीयपंथीयांना रेल्वे, एसटी आणि बसमध्ये बसण्यासाठी आरक्षित जागा ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच या तृतीयपंथीयांना लोकल, बस आणि एसटीचा प्रवास मोफत देण्याची मागणीही सुर्वे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केल्याचंही सुर्वे यांनी सांगितलं. डॉ. पवन यादव हे तृतीयपंथीयांचे प्रमुख आहेत. ते दोनशे तृतीयपंथीयांना घेऊन माझ्याकडे आले होते. मुख्यमंत्री गोरगरीबासांठी काम करत असतात. त्यांनी आमच्याही समस्या सोडवाव्यात. असं देखील यादव यांनी सांगितलं.
त्यानुसार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक उत्तर दिलं. काही दिवसात त्यावर निर्णय होऊन तृतीयपंथीयांना आरक्षण मिळेल, असं ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून विरोधक सरकारला घेरण्याचं काम करत आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय येत आहे. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, बोंबाबोंब करण्याशिवाय विरोधकांकडे कोणतंही काम उरलं नाही. काल ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप एक नंबरला गेले. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यातूनच ते बोंबाबोंब करत आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.