राज्यातील कृषी, आरोग्यासह विविध क्षेत्रांतील शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तसेच तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी राज्य शासनाने गुगलसोबत सामंजस्य करार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात हा करार करण्यात आला. गुगल इंडियाच्या मुंढवा येथील कार्यालयात करण्यात आलेल्या या कराराप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता, नागपूर येथील ट्रीपल आयटीचे संचालक प्रा. डॉ. ओमप्रकाश काकडे, ॲक्सिस माय इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता या प्रसंगी उपस्थित होते.
गुगलसोबत राज्य सरकारची 7 क्षेत्रांसाठी भागीदारी
नाविन्यता आणि उद्योजकतेतील भागीदारीद्वारे गुगल राज्यातील स्टार्टअप इको सिस्टीमला तसेच उद्योजकता विकासाला एआय तंत्रज्ञान पुरवून सहकार्य करणार आहे. तसेच कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, नगर नियोजन, वाहतूक नियोजन अशा क्षेत्रांसाठी या कराराद्वारे गुगलचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय सेवांमध्ये नाविन्यता आणून, सर्वसामान्य माणसापर्यंत शासकीय योजना प्रभाविपणे पोहचविण्यासाठीदेखील तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. त्यामुळं आता गुगल आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्याचा विकास करण्याचे धोरण सरकारनं आखल्याचं पहायला मिळतंय.