लोकसभेची निवडणुक जेमतेम महिना ते दीड महिन्यांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक पक्षानं त्यासाठी तयारी सुरु केली असून राज्यात महायुती व महाआघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. मागच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणं यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीची डोकंदुखी ठरणार की त्यांच्यासाठी महत्वाचा फॅक्टर राहणार? खरंच वंचित बहुजन आघाडीची ताकद २०१९ प्रमाणं यंदाच्या निवडणुकीत देखील दिसून येईल का असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाला आणखी व्यापक करण्याच्या दृष्टीकोनातून २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी म्हणून महाराष्ट्रात उभारणी केली. दलित, मागासवर्गीय समाजाबरोबरच बहुजन समाजातील सर्व जाती प्रजातीतील वंचित घटकांना आणि मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांना चांगलाच दणका दिला. विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव वंचितमुळेच झाला असं चित्र निकालातील मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आलं. अगदी सोलापूर लोकसभा मतदार संघातून देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या ताकदवान व ज्येष्ठ नेत्यांचा पराभव वंचित मुळं झाल्याचं स्पष्ट झालं. केवळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर, छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा देखील पराभव वंचितमुळंच झाला अशी निकालाची आकडेवारी सांगते. या निकालाच्या आकडेवारीवरून जवळपास ८ ते १० लोकसभा मतदार संघात वंचितमुळं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला होता… आणि म्हणून आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी सोबत हवी आहे.
२०१९ मध्ये जी ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये होती ती आज आहे का…? २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असलेली ओवेशी यांची एमआयएम आज सोबत नाही शिवाय २०१९ मध्ये जी आक्रमकता वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसून आली ती आज दिसून येत नाही. विविध पक्षामध्ये असलेले अनेक छोटे छोटे नेते त्यावेळी वंचितमध्ये एकत्र आले होते. मराठा, माळी, धनगर, वंजारी, बंजारा अशा अनेक समाजाचं प्रतिबिंब वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसून येत होतं ते आज तितक्या प्रमाणात राहिलं नाही. दरम्यानच्या या पाच वर्षांच्या काळात पक्षाची बांधलेली मोट थोडी सैल झालेली दिसते. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जागावाटपावेळी जेव्हा प्रकाश आंबेडकर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला आपापली ताकद बघून जागांवर दावा सांगण्याचा सल्ला देतात तेव्हा हाच मुद्दा त्यांनाही लागू होताना दिसतोय आणि म्हणूनच त्यांच्या २७ लोकसभा मतदार संघाच्या मागणीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे.
प्रकाश आंबेडकर यांना दलित, मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजातून चांगला पाठिंबा आहे… गेल्या लोकसभेला वंचितला राज्यात एकूण ४० लाखांवर मतं मिळाली होती. आता मात्र, मागच्या इतका पाठिंबा असेल असं ठामपणे कुणीच सांगू शकत नसलं तरी, आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्वाचा फॅक्टर आहेत. हे नक्की. आता लोकसभेसाठी ते महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांचा निर्णय फायनल झाल्याचं दिसत नाही. जागावाटप लवकर करा असं आवाहन करताना प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मविआ च्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहू नका म्हणून सांगितलं आहे. नेमकं काय होणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी महत्वाचा फॅक्टर ठरतील असं वाटतं… परंतु, जागावाटपावरून बिनसलं आणि आंबेडकरांनी स्वतंत्र वाट धरली तर, महाराष्ट्रातील निवडणुकीचं गणितं बिघडतील असं वाटत आहे.