महाराष्ट्रातील चार टप्प्यांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष पाचव्या टप्प्यातील मतदानावर केंद्रीत झालंय. अशा परिस्थितीत मुंबईसह नाशिक, पालघर, भिवंडी आणि इतर ठिकाणी राज्यातील आणि केंद्रातील अनेक दिग्गजांनी तळ ठोकलाय. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला.
या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला. काही दिवसांपासून राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. यावेळी पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली असा आरोप राज ठाकरेंनी जाहीर सभेतून केला. या आरोपाला आता शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंचं सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणातील स्थान काय हे माहिती नाही. मी ऐकलं होतं नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, अनेक दिवस ते नाशिकमध्ये फिरकले नाहीत असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
याशिवाय पुढे बोलताना शरद पवारांनी महायुती आणि भाजपवरही हल्ला चढवला. “मी राज्यभरात फिरत आहे. राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. लोक बदलासाठी तयार आहेत. भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, हे मत विशेषत: शेतकरी वर्गाचे आहे. जनमत भाजपसोबत नाही”, असे शरद पवार यांनी म्हटले.