महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल विद्यार्थ्यांना mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यावर्षीच्या निकालातील काही विशेष गोष्टी अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमाकि व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेतून शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल जाहीर केला.
यावर्षीही बारावीचा एकुण निकाल 93.57 टक्के लागला असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून शरद गोसावी यांनी जाहीर केलं आहे. यंदाच्या वर्षीही बारावीच्या परिक्षेत राज्यात मुलींनी बाजी मारल्याचं अधोरेखित झालं आहे. या परिक्षेत मुलांचा निकाल 92.60 टक्के तर मुलींची निकाल 95.49 टक्के लागलाय. शिवाय राज्यातील 9 विभागिय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 97.51 टक्के लागला असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (91.95 टक्के) लागला आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९३.३७ इतकी आहे. यापैकी विज्ञान शाखेतून सर्वाधिक ७ लाख ६० हजार ०४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. तर, कला आणि वाणिज्य शाखेतून अनुक्रमे ३ लाख ८१ हजार ९८२ आणि ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
विशेष बाब म्हणजे यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.
राज्य शिक्षण मंडळाचा विभाग निहाय निकाल खालीलप्रमाणे
- कोकण विभाग : 97.51 टक्के
- नाशिक विभाग : 94.71 टक्के
- पुणे विभाग : 94.44 टक्के
- कोल्हापूर विभाग : 94.24 टक्के
- छत्रपती संभाजीनगर विभाग : 94.08 टक्के
- नागपूर विभाग : 93.12 टक्के
- अमरावती विभाग : 93 टक्के
- लातूर विभाग : 92.36 टक्के
- मुंबई विभाग : 91.95 टक्के
विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार निकाल?
- mahresult.nic.in
- http://hscresult.mkcl.org
- www.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- http://results.targetpublications.org