मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी रणशिंग फुंकलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.
सर्व्हे झाला, किती जागा लढणार?
आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे पूर्ण झाला आहे. तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. निवडून येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल. कोणालाही तिकीट दिले जाणार नाही, पैसे काढणाऱ्यांना तिकीट नाही. जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिकपणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल, असं म्हणत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.
सोबतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकं मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत. काही लोकं हसतील, पण ती गोष्ट घडणारच. आपण सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढणार आहोत. कोणतीही युती नाही. 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे. यावेळी मी बैठका घेणार आहे, असंही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.