महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत कुठली योजना असेल तर ती आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही योजना इतकी चर्चेत आहे की अगदी अर्ज करण्यापासून ते या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या निधीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. असं असतानाच आता या योजेनच्या नावावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय घडलं की सरकारमधल्या दोन प्रमुख नेत्यांच्या पक्षात यावरून का वाद होईल? तर यामागचं कारण फारच मजेशीर आहे. नेमकं काय घडतंय या योजनेच्या नावावरून? का उपमुख्यमंत्री अजितदादांकडून व त्यांच्या पक्षाकडून योजनेच्या नावाच्या वापरात बदल होतोय? नेमका हा बदल काय केला जातोय ? हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या योजनेचं नाव आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ खरं तर हेच नाव सगळीकडं व सर्वांनीच घ्यायला हवं. परंतु, राज्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन प्रमुख पक्षांकडून याचा उच्चार आणि लिखाण वेगवेगळं होताना स्पष्टपणे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सर्व जाहिरातीमध्ये, सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असाच उल्लेख असतो. मात्र, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश पोस्ट ‘माझी लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या बोलण्यामध्ये देखील असाच उल्लेख असतो. हा विरोधाभास सातत्यानं दिसत असल्यानं ही लाडकी बहीण योजना नेमकी कुणाची अजित दादा की मुख्यमंत्री शिंदेंची? असा प्रश्न उपस्थित होतोय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून ‘मुख्यमंत्री’ या नावाचा उल्लेख का वगळला जातोय? हे अनावधानानं होतंय की खरंच यामागं काही राजकारण असू शकतं ? मुळात एक गोष्ट याठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री देखील आहेत. २८ जून २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही योजना जाहीर केली. त्यानंतर अजित पवार यांच्या फेसबुक पेजवर सुरुवातीला काही पोस्टमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख दिसला. परंतु, त्यानंतरच्या पोस्ट, रिल्स, शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये या योजनेचा माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख दिसून येऊ लागला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरील पोस्ट आपण पाहिल्या तर त्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असाच उल्लेख केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे मुख्यमंत्री शब्द वगळून अजित पवार योजनेचं संपूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्याचं कारण म्हणजे ही योजना महिला व बालकल्याण खात्याची आहे. त्यावर या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांना काम करण्यास सांगितलं होतं. ही योजना मध्य प्रदेश सरकारनं निवडणुकीआधी जाहीर केली आणि अवघड वाटत असलेली निवडणूक त्यांच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी सोपी गेली. त्यांना बहुमत मिळालं. त्यामुळं महाराष्ट्रात सध्या लोक प्रक्षोभाला बळी पडत असलेल्या महायुती सरकारकडून पुन्हा लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या योजना सध्या घोषित होत आहेत. त्याचाच भाग म्हणून ही योजना जाहीर झाली.