महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठं गिफ्ट दिल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी १६ ऑगस्टला बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गाला सरकारने हिरवा कंदील दिला असून या प्रकल्पाचे काम २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसंच ठाण्यातील इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे.
पुणे मेट्रो फेज १ प्रकल्पाच्या विद्यमान पीसीएमसी स्वारगेट मेट्रो मार्गाच्या स्वारगेट ते कात्रजपर्यंत भूमिगत मार्गाच्या ५.४६ किमी विस्तारासाठी मान्यता देण्यात आली. यामध्ये तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल, जो मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडेल. या प्रकल्पाची किंमत साधारणतः २९५४.५३ कोटी रुपये आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासह ठाण्यातील इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. या कॉरिडॉरची एकूण लांबी २९ किलोमीटर असून यात २२ स्थानके आहेत. हा प्रकल्प नौपाडा, डोंगरीपाडा, वागळे इस्टेट, हिरानंदानी इस्टेट, साकेत, कोलशेत, इत्यादी प्रमुख भागांना जोडला जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत साधारणतः १२,२००.१० कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या खर्चाच्या वाट्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समान वाटा असेल. महाराष्ट्रातील हे दोन्ही मेट्रो प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.