बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. बदलापूर प्रकरणावरील रोष पाहता कोर्टाने सू मोटो याचिका दाखल करुन घेतली होती. कोर्टात या प्रकरणी तातडीची सुनावणी घेण्यात आली. मुंबई उच्च न्यायालायाने या प्रकरणी बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. तसंच, पीडित मुलीची ओळख उघड केल्यामुळं न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना झापलंय. मुंबई उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? हे आपण जाणून घेणार आहोत.
आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयात बदलापूर प्रकरणी सुनावणी सुरू झाली होती. मात्र, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या सुनावणीलादेखील विलंब झाला. महाधिवक्ता बीरेंद्र सराफ बऱ्याच कालावधीनंतर न्यायालयात पोहोचले होते. त्यांनी न्यायालयाकडून 15 मिनिटांची वेळ मागून घेतली होती. SIT कडे सगळे कागदपत्र का दिले नाही, असा सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे.बदलापूर प्रकरणावरुन गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करण्यात आली होती. यानंतर त्या पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले होते. यावरही कोर्टाने खडसावले आहे. नुसत निलंबन करुन काय होणार? असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. कायद्याचे पालन केलं गेलं आहे का? असंही कोर्टाने विचारलं आहे. भारतीय न्याय संहितेत व्हिडिओ रेकॉर्डिंग ची अट आहे ते झालं आहे का? कोर्टाने व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवण्याचीदेखील मागणी केली. पुढच्या सुनावणीला पोलिसांनी केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. कोर्टात सुनावणीला सुरू झाल्यानंतर महाधिवक्तांकडून खंडपीठाकडून मुळ FIR कॉपीची मागणी आणि FIRची मूळ डायरी व ओरिजनल डायरीचीही मागणी करण्यात आली. त्यावेळी महाधिवक्तांनी सरकारची बाजू मांडत असताना त्यांनी या प्रकरणाची सूत्रे SITकडे सोपवण्यात आली असून तपासात काहीच त्रुटी नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान यावेळी पीडित मुलीची ओळख उघड केल्याने न्यायालयाने झापले आहे.