पुणे | महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्या तर्फे दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी पुकारलेला ‘एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद’ तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीतर्फे ललीत गांधी यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदची व्याप्ती लक्षात घेऊन राज्यशासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आज उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार माधुरी मिसाळ व पणन, वित्त सहकार- नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी यांनी प्रास्ताविक केले. कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया व दि पूना मर्चेंटस् चेंबर्सचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समितीच्या विविध प्रश्नांची मांडणी केली. फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी जी.एस.टीचे प्रश्न मांडले. तसेच मोहन गुरनानी, दिपेन अगरवाल व भिमजी भानुशाली यांनी चर्चेमध्ये भाग घेतला. यावेळी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्न समजून घेतले आणि बाजार समिती विषयाबरोबरच जी.एस.टी व अन्य विषयासाठी कृती समिती सदस्य व मुख्यसचिव व अन्य अधिकारी वर्गाची उच्चस्तरीय समिती गठित केली. सदर समितीने ३० दिवसांमध्ये योग्य निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. दरम्यान या बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ललीत गांधी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन व्यापाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली व बंद मागे घ्यावा असे आवाहन केले. तसेच आमदार माधुरी मिसाळ यांनी या बैठकीसाठी प्रयत्न केले. कृती समितीने चर्चा करुन २७ तारखेचा एक दिवसीय राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, फॅमचे सचिव प्रितेश शहा, ग्रोमाचे सचिव नितेश विरा, दि पूना मर्चेंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, अनिल भन्साळी उपस्थित होते. तर ग्रोमाचे अध्यक्ष भिमजी भानुशाली यांनी आभार मानले.