सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यामधून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला.आज मालवणमध्ये या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात आला. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे तसेच विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे घटना स्थळाची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर आले. त्याचवेळी भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे देखील त्या ठिकाणी आले. आदित्य ठाकरे तिथं आल्यानंतर राणे समर्थकांकडून आदित्य ठाकरेंना पेंग्विन पेंग्विन अशा घोषणा देण्यात आल्या. तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आम्ही कोंबड्या आणल्या नाहीत असे उत्तर दिले. त्यानंतर राजकोट किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ राणे आणि ठाकरे समर्थक चांगलेच भिडल्याचे पाहायला मिळाले. तसेच यामध्ये काही पोलिसही जखमी झाले.
आदित्य ठाकरे हे तब्बल दीड ते दोन तास त्याठिकाणी ठिय्या मांडून बसले होते. त्यांनतर नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेत. ‘आम्ही इथून हलणार नसून आमच्यावर गोळ्या घालायच्या तर घाला. आम्ही घाबरत नाहीत तसेच पोलिसांना, त्यांना काय सहकार्य करायचं ते करू देत, आमचा अंगावर आले तर रात्रभरात एक एकाला मारून टाकीन’ असे आक्रमक विधान केले.
त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिकिया देत, भाजप नेते नारायण राणे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस म्हणाले, राणेसाहेब नेहमी आक्रमक असतात, ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे. पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटतं नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील ते कुठेही पळून गेले तरी त्यांना शोधून काढू आणि त्यांच्यावर कारवाई करू असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सारवासारव करत नारायण राणेंची पाठराखण केली.