लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने “अबकी बार चारसो पार” चा नारा दिला होता. परंतु, भाजप ४०० पार करण्यात अयशस्वी ठरला. आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेला जे झालं ते होऊ नये यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसलीय. विधानसभा निवडणूक दोन ते अडीच महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपनं महाराष्ट्रात मिशन सव्वाशे पार ठरवल्याची चर्चा आहे. यासाठी भाजपनं नियोजन सुरु केलं आहे. आता भाजपने सुरु केलेल्या या मिशनचा विधानसभेला भाजपला किती फायदा होणार…? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट आली. या मोदी लाटेत भाजपसह मित्रपक्षांनी ३३६ जागांवर विजय मिळवला. भाजपने स्वतंत्र २८२ जागांवर विजय मिळवत एनडीएचे सरकार स्थापन केले. त्याचप्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने ३०३ जागांवर विजय मिळवला. आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पारचा नारा दिला. परंतु या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची अनेक कारणं आहेत. यापैकी बेरोजगारी, अग्निवीर योजना, महागाई, कुस्तीपटूंनी दिल्लीत केलेले आंदोलन, शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन… शेतीमालाला हमीभाव न मिळणं यासह इतर अनेक कारणं भाजपच्या ४०० पारचं मिशन यशस्वी न होण्यामागं मानली गेली. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला. उत्तर प्रदेश मध्ये राम मंदिराचं निर्माण हा मुद्दा असतानाही फटका बसला तर, महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड आणि मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसला. केंद्रात १० वर्ष सरकार असून सुद्धा महाराष्ट्रात भाजपला केवळ ९ जागा जिंकता आल्या.