राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार, सभा, रॅली तसेच विविध कार्यकमांचं आयोजन केलं जातंय. जागावाटपाबाबत ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. आणि आता डोळे लागलेत ते विधानसभा निवडणूक कधी होणार याकडे. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. निवडणूक आयोगाकडूनही त्यासाठीची कार्यवाही सुरु झाल्याचं दिसतंय. ही निवडणूक निःपक्षपातीपणे पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे. राज्यात काही संवेदनशील क्षेत्र असून त्यांचा निवडणुकीसंदर्भात घ्यावयाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग २७ व २८ सप्टेंबर असा दोन दिवस महाराष्ट्र दौरा करत आहे. या दौऱ्यात राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या दौऱ्यानंतर निवडणूक कधी आणि कशी होणार हे स्पष्ट होईल.. पण त्याआधी आयोगाकडून नेमके काय संकेत मिळाले आहेत? विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार की एका टप्प्यात होणार? चर्चा नेमकी काय आहे? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे.. त्याआधी राज्यातील विधानसभेची निवडणूक होऊन नवीन सरकार अस्तित्वात आलं पाहिजे. ही तारीख़ पाहता राज्य निवडणूक आयोग त्या दृष्टीनं कामाला लागलंय असं दिसतं. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील मतदार यादी अद्यावत करण्यापासून, निवडणुकीसाठी लागणारे शासकीय, निम शासकीय कर्मचारी त्याचबरोबर पोलीस यंत्रणा, होमगार्ड व निवडणुकीसाठी लागणारी मतदान केंद्र, त्यासाठी लागणारी वाहने याची परिपूर्ण माहिती आयोगाने संकलित केली आहे. या दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राज्य निवडणूक आयोग, राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, गृहसचिव, मुंबई पोलीस आयुक्त, महसूल आयुक्त, परिवहन आयुक्त, होमगार्डचे महासंचालक यांच्यासह राज्यातील सहा विभागातील सहा विभागीय आयुक्त यांच्याशी बैठका घेतील. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा किंवा गरज पडल्यास राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुंबईत पाचारण करतील आणि त्यांच्याकडून मतदान केंद्रनिहाय आढावा घेतला जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राज्याच्या दौऱ्यावरून परत गेल्यानंतर साधारणतः आठ दिवसात आयोग महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जाहीर करण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांकडून वर्तवली जात आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही किती टप्प्यात होणार याबाबत सर्वच पक्षात सुरु असलेल्या अनेक उलट सुलट चर्चा आपण ऐकतोच आहोत. सत्ताधारी पक्षाने म्हणजेच महायुतीनं राज्यातील निवडणूक ही पाच टप्प्यात घ्यायला सांगितलं होतं. त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोध दर्शवला. त्यामुळे निवडणूक झाली तर ती दोन टप्प्यात होईल किंवा एकाच टप्प्यात पार पडेल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातल्या नेत्यांना मिळाले असल्याचं बोललं जातंय.