राज्यात विधानसभा निवडणुक जवळ आल्याने राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहेत. प्रत्येक पक्षाकडून आपापल्या मतादारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु आहे. विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी भेटीगाठी देखील घेतल्या जात आहेत. त्याचप्रमाणं सर्व राजकीय पक्षांकडून मतदारसंघावर दावेदारी देखील सांगितली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरुड विधानसभा मतदारसंघात हालचालींना मोठा वेग आलाय. अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.तर हा मतदारसंघात शेकापचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसने या ठिकाणी दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्वी शेकापचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असला तरी आगामी विधानसभेसाठी मात्र, शेकापने हा गड आपल्याकडे मिळविण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यामुळे काँग्रेसने अलिबाग- मुरुड इथं दावेदारी सांगितल्याने आता महाविकास आघाडीमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवीण ठाकूर म्हणाले की, रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद ही अलिबाग मतदारसंघात जास्त असून ही जागा आम्हालाच मिळावी. तसेच शेकापने यंदा हा मतदारसंघ आम्हाला देऊन त्यांनी अन्य जागेवर निवडणूक लढवावी. त्यामुळे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आता अलिबाग मुरुड मतदारसंघ काँग्रेससाठी सोडतीलचं आणि ही जागा आम्ही खात्रीने जिंकून आणू असा विश्वास देखील प्रवीण ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेला अलिबाग- मुरुड मतदारसंघ 2019 ला शिवसेनेने जिंकला. शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण 1 लाख 11 हजार 946 मते मिळाली. तर शेतकरी कामगार पक्षाचे सुभाष पाटील यांना एकूण 79 हजार 022 एवढी मतं मिळून 32 हजार 924 मतांनी यांचा पराभव झाला. मात्र यावेळी शेकापने पुन्हा एकदा या जागेसाठी शड्डू ठोकले असून काँग्रेसने यामध्ये दावेदारी सांगितल्यामुळे वाद वाढणार का? तसेच महाविकास आघाडी याबाबत काय निर्णय घेणार ते पाहणं मह्त्वाच असणार आहे.