नेत्यांची डोकेदुखी वाढणार?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच मुंबईतील आमदारांना मंत्रिपदे देताना आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिली जाणार आहे. याचदरम्यान काही संभाव्य नावे समोर आली आहेत. महायुतीचे हे संभाव्य मंत्री नेमके कोण ? कोणाची नावं समोर आली आहेत. मागच्या वेळी जे नेते मंत्रिपदासाठी इच्छुक होते. परंतु वाटाघाटीत ज्यांना तडजोड करावी लागली त्यांना आता यावेळी संधी दिली जाणार का ? मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची नेमकी कशी डोकेदुखी वाढणार आहे ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
भाजपमधून राहुल कुल, संभाजी पाटील निलंगेकर, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड ही संभाव्य नावं सध्या समोर आली आहेत. यात आणखी काही नावांचा देखील समावेश असू शकतो. शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची देखील नावं समोर आली आहे. यामध्ये शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संजय शिरसाट, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे या नावांचा समावेश आहे. अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी समोर आली असून यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या नावांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. याशिवाय अनेक आमदारांनीही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल, असं सांगितलं जात आहे. तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी शिंदे सेनेच्या आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अशीच स्थिती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत २-२-१ असा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो अशीही चर्चा सुरु आहे.