या विधानसभा निवडणुकीत अनेक दिगज्जांना पराभवाला सामोरं जावं लागलं. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर, अचलपूरमधून बच्चू कडू यासारख्या दिग्गज नेत्यांना पराभावाचा सामना कारवा लागला. नात्या-गोत्याचं आणि घराणेशाहीचा मोठा इतिहास असलेल्या नगर जिल्ह्यात देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. संगमनेरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तर नेवाश्यातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव झाला. गडाख यांच्या ताब्यात नेवासा नगरपंचायत, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती तसेच सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य असताना तसेच मुळा आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना जमेची बाजू असताना झालेला पराभव अनेकांना धक्का देणारा ठरला. शंकरराव गडाख यांचे वडील आणि नगर जिल्ह्यातले दिग्गज नेते यशवंतराव गडाख हे एकेकाळी नगर जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. बाळासाहेब विखे यांच्यासारखं प्रस्थ जिल्ह्यात असतानाही गडाख हे लोकसभेवर निवडून जायचे. १९८४, १९८९ आणि १९९१ अशा सलग तीन वेळा ते नगरचे खासदार म्हणून निवडून आले. ९० च्या दशकात काँग्रेसमध्ये शरद पवारांचा दबदबा होता.. हेच वजन वापरुन पवारांनी १९९१ च्या लोकसभा निवडणणुकीचं तिकीट यशवंतराव गडाख यांना दिलं होतं. समोर प्रतिस्पर्धी उमेदवार होते बाळासाहेब विखे पाटील. विखे पाटलांना या निवडणुकीला अपक्ष उभं रहावं लागलं. शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी या निवडणुकीत अत्यंत टोकाचा प्रचार केला आणि विखे पाटलांना पाडलं. यशवंतराव गडाख निवडून आले. त्यामुळे जसा पवार विखे संघर्ष असायचा तसा गडाख विखे संघर्ष सुरु झाला. नेवासा विधानसभा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे २००९ आणि २०१९ अशा दोन वेळा निवडून आले. पण यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. नेवासा विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख, शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंघे आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून बाळासाहेब मुरकुटे यांच्यात तिरंगी लढत झाली. शिंदे सेनेच्या विठ्ठलराव लंघे यांनी शंकरराव गडाखांना पराभूत केलं. शंकरराव गडाख पराभूत होणार नाहीत असं त्यांचे कार्यकर्ते आत्मविश्वासाने सांगत होते परंतु त्याच वेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली प्रचारयंत्रणा मैदानात उतरवली होती. नेवाश्यात नेमकं काय घडलं ? राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या विठ्ठलराव लंघे यांनी गडाखांचा बालेकिल्ला नेमका कसा भेदला ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात विठ्ठलराव लंघे आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्यातच आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे विरोधी मतात विभागणी होऊन शंकरराव गडाख विजयी होतील असं चित्र होतं. गड़ाख यांचे कार्यकर्ते विजयाचा विश्वास व्यक्त करत होते. मात्र गडाख यांचा पराभव झाला. विठ्ठलराव लंघे यांनी 4, 021 मतांच्या फरकाने शंकरराव गडाख यांना पराभूत केलं. विठ्ठलराव लंघे यांना 95,444 मतं तर शंकरराव गडाख यांना 91,423 मतं मिळाली. बाळासाहेब मुरकुटे तिसऱ्या स्थानी राहिले. त्यांना 35,331 मतं मिळाली..लंघे आणि मुरकुटे यांची मतं एकत्र केली तर नेवासा तालुक्यात यंदा गडाख विरोधी मतांची गोळाबेरीज 1,30,775 असल्याचं स्पष्ट झालं. विठ्ठलराव लंघे हे भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होते. राधकृष्ण विखे पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय, शांत-संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. 2004 मध्ये त्यांनी नरेंद्र घुलेंविरुद्ध तर 2009 मध्ये शंकरराव गडाख यांच्या विरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकांत त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत ऐनवेळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लंघे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे भाजपातून इच्छुक असलेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत प्रहार पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यामुळे तालुक्यातील गडाख विरोधी मतांची लंघे-मुरकुटे यांच्यात विभागणी झाली. तरीही लंघे यांचा 4,021 मतांच्या फरकाने विजय झाला. लंघेंच्या या विजयात तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा वाटा असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि राज्यपातळीवरील महायुतीचे प्रचारातील मुद्दे तितकेच कारणीभूत ठरले असल्याचं बोललं जातंय. लाडकी बहीण योजनेचा ही परिणाम दिसून आला. त्याचबरोबर ‘बटेंगे तो कटेंगे’ हा प्रचार राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी उचलून धरला होता. तसेच मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना वैयक्तिक टार्गेट केल्याने ओबीसी समाज हक्काचं आरक्षण हिसकावलं जात असल्याच्या भावनेतून महायुतीच्या पाठीमागे उभा राहिल्याचं चित्र दिसलं. राज्यात दिसलेले हे तीन फॅक्टर नेवासा विधानसभा मतदार संघातही लागू झाल्यानं विरोधी मतांमध्ये विभाजन झाल्यानंतरही गड़ाख पराभूत तर लंघे विजयी झाले.