मुंबई | शिवसेना नेते संजय राऊतांनी रामदेव बाबांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. रामदेव बाबांचे हे विधान अतिशय लज्जास्पद होतं. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी तिथे होत्या. मात्र त्या गप्प बसल्या. त्यांनी सणसणीत कानाखाली द्यायला पाहिजे होती. याबाबत सरकारने जीभ गहाण ठेवलीय का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीला चालले आहेत. ठाकरे हेच खरं सरकार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरेंची आजची बुलढाण्यातली सभा ऐतिहासिक होणार आहे. तसेच अनेक लोक सोबत येत आहेत. भारतीय जय हिंद पार्टीने आम्हाला पाठिंबा जाहीर केलाय. राज्यपाल चुकीचं विधान करतात, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त बोलतात आणि रामदेव बाबा महिलांना लज्जास्पद बोलतात. एवढं सगळं सुरु असतांना सरकार गप्प का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरली. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.
विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे या सर्वांच्या उपस्थित केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.