भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणांतून रॉलय चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्ठान रॉयल्स या आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वीचे सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द करण्यात आली असल्याचीही माहिती समोर आली आहे. आरसीबीचा सराव मंगळवारी गुजरात कॉलेज ग्राऊंडवर होणार होता. मात्र, विराट कोहली आणि इतर खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणांतून हे सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.
गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीचा दाखला देत एका बंगाली वृत्तपत्रानं याबाबतची बातमी प्रसारित केली आहे. गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा अहमदाबाद विमानतळावरून चार जणांना अटक केली होती. दहशतवादी कारवायांच्या संशयातून या 4 जणांना अटक करण्यात आली होती. सोबतंच अटक केल्यानंतर या 4 संशयित आरोपींकडून पोलिसांना शस्त्र, व्हिडीओ आणि काही टेक्स्ट मेसेज मिळाले होते.
या कारवाईनंतर संबंधित प्रकरणाची माहिती दोन्ही संघांना देण्यात आली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने सराव सत्र आणि नियोजित पत्रकार परिषद रद्द केली. सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द करताना आरसीबीच्या संघाकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या जीवाला धोका असल्याचं सांग्यात आलं. विराट कोहली भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचं नाव आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. असं या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणानंतर आता आरसीबीचा संघ ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या हॉटेलबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतंच आरसीबीच्या संघाला विशेष मार्गाने मैदानात नेलं जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.