क्रिकेटमध्ये हार जित होत राहते असं कितीही म्हंटलं तरी एखाद्या टीमकडं अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत.संपूर्ण स्पर्धेत ती टीम भारी खेळ करते.अनेकदा रडत धडपडत का होईना नॉक आऊट्समध्ये पोहोचते.आत्ता जिंकेल आणि ट्रॉफी घरी घेऊन जाईल असं वाटतं आणि प्रत्येक वेळी ऐन मौक्याच्या क्षणी संघाचं कॉम्बिनेशन बिघडतं आणि विजयाच्या तोंडावर येऊन संघाच्या पदरी निराशा पडते.आता एवढं सगळं वर्णन केल्यानंतर क्रिकेटमधील दोन संघांची नावं तुमच्या मनात आली असतील एक विराट कोहलीची आरसीबी आणि दुसरी दक्षिण आफ्रिका.आजचा विषय दक्षिण आफ्रिकेचा.प्रत्येक वेळी सेमी फायनलमध्ये जाऊन हरणारी आफ्रिका सध्याच्या टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचलीये.आफ्रिकेनं पहिल्यांदाच टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आणि आपल्यावर लागलेला चोकर्सचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला.पण आफ्रिकेच्या संघाला चोकर्स नेमकं का म्हणायचे आणि त्यांनी हा शिक्का कसा पुसून काढलाय याची ही स्टोरी…
टी-20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली.या सामन्यात आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा 56 धावांवर ऑल आऊट काढला आणि 9 विकेट्सनं सामना जिंकून थाटात फायनल गाठली.या विजयासह आफ्रिका फायनलमध्ये पोहोचली आणि यासोबत त्यांनी आपल्यावर लागलेला चोकर्सचा डाग पुसून काढलाय.पण आफ्रिकेवर चोकर्सचा शिक्का नेमका का बसला होता.तर, दक्षिण आफ्रिकेला आयसीसीच्या वनडे आणि टी20 अशा दोन्ही वर्ल्डकपमध्ये मिळून तब्बल 7 वेळा सेमी फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागलाय.सातही वेळेस आफ्रिकेच्या संघानं लीग स्टेजमध्ये भारी कामगिरी केली आणि प्रत्येक वेळी खराब खेळ असे किंवा गंडलेलं नशिब यामुळं आफ्रिकेला फायनल गाठण्यास अपयश आलं.यामुळंच आफ्रिकेला क्रिकेट जगतात ‘चोकर्स’ म्हणून ओळखले जाऊ लागलं.आता प्रश्न असा पडतो की चोकर्स हा शब्द कुठून आला?
चोकर्स हा टॅग चोक या शब्दावरून आला.एखादं टार्गेट अचिव करताना किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचत असताना ठराविक ठिकाणी अडकून पडणं म्हणजे चोक होणं.दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीतही असच घडतं.अनेकदा ते विजयाच्या अगदी जवळ पोहोचतात आणि त्याच त्याच चूका करून विजयापासून दूर अडकून पडतात.मोठ्या आणि बाद फेरीच्या सामन्यांमध्ये ते नेहमी पराभूत होत आले. त्यामुळं त्यांना क्रिकेट जगतात चोकर्स म्हणून संबोधलं जाऊ लागलं.आता नेमकं कधी कधी आफ्रिकेनं सेमी फायनलमध्ये जाऊन पराभव पचवलाय तेही पाहुयात.याची सुरुवात होते ती 1992च्या विश्वचषकापासून.1992 साली पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका वनडे विश्वचषकात सहभागी झाली आणि पहिल्याच फटक्यात त्यांनी सेमी फायनल गाठली.यावेळी त्यांना इंग्लंडनं पराभूत केलं आणि पहिल्यांदा मोठ्या स्टेजवर आफ्रिकेचा पराभव झाला.त्यानंतर 1999 सालच्या वनडे वर्ल्डकपमध्ये आफ्रिकेनं पुन्हा सेमी फायनल गाठली यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देत सामना 213 धावांवर टाय केला.मात्र, यावेळी सुपर 6 फेरीत ऑस्ट्रेलिया वरच्या क्रमांकावर असल्यानं त्यांची फायनलमध्ये वर्णी लागली.पुढे 2007 वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, 2015च्या वनडे विश्वचषकात न्यूझीलंड आणि 2023च्या वनडे विश्वचषकात पुन्हा ऑस्ट्रेलियानं सेमी फायनलमध्ये आफ्रिकेचा पराभव केला.टी20 वर्ल्डकपबाबत बोलायचं झालं तर 2009 आणि 2014च्या टी20 विश्वचषकातही आफ्रिकेनं सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती.यातील 2009 साली पाकिस्तान आणि 2014 साली धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं आफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती.हा सगळा इतिहास पाहिल्यावर आफ्रिकेचा संघ ऐन सेमी फायनलमध्ये येऊन खराब कामगिरी करतो असा शिक्का त्यांच्यावर बसला होता मात्र, या वर्ल्डकपमध्ये त्यांनी तो पुसून काढत निदान फायनलपर्यंत मजल मारलीये.