उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला टोला
मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी बजरंग बली कि जय म्हणत मतदान करण्याचे आवाहन करतात. जर निवडणूक आयोगाने हा नियम शिथिल केला असेल तर मग मी जनतेला आवाहन करतो जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम म्हणून मतदान करा,राज्यकर्त्यांना सद्बुद्धी मिळो म्हणून गणपती बाप्पा मोरया म्हणून देखील मतदान करा असा टोला लगावत याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करावा अशी मागणी शिवसेना उध्द्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पूर्वी जे बंधन होते ज्यावरून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे यांना जी शिक्षा दिली, तो निर्णय योग्य होता कि अयोग्य कि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे करतात ते योग्य आहे हे त्यांनी देशाच्या जनतेला सांगावे असं मातोश्री येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले.देशातील पहिली निवडणूक आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढलो आणि जिंकलो. नंतर भाजप आमच्यासोबत आला. त्या निवडणुकीनंतर 1995 मध्ये राज्यात आमचं सरकार आलं. तोपर्यंत आमचे पाच ते सहा आमदार बाद ठरवले गेले.आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढलो म्हणून सहा वर्षासाठी आमचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता. आम्ही हिंदुत्वाचा नारा दिला तेव्हा आमच्यावर कारवाई केली. मतदानाचा अधिकार काढला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.तसेच आचार संहितेत जर बदल केला असेल तर तो केव्हा केला, कधी केला आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आम्हाला का सांगितला नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवल्याचे सांगितले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यप्रदेशच्या मतदारांना रामलल्लाचं दर्शन मोफत देऊ नये तर देशातील सर्व राम भक्त जनतेला मोफत अयोध्यावारी घडवून आणावी. इतकंच नव्हे तर मणिपूर किंवा जम्मू काश्मीरच्याही लोकांना अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन मोफत घडवून आणावे असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजप हायकमांडला लगावला.