पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप पारख यांची नियुक्ती
पुणे | एकटा व्यक्ती, एकटा व्यावसायिक फार काळ टिकू शकत नाही. एकत्र नाही आलात आणि असच पुढे चालू राहिले तर, येणाऱ्या काळात ४०-५०% रिटेलर सुद्धा टिकणार नाहीत. त्यामुळे एकता ठेवा आणि संघटनेवर विश्वास ठेवून एकत्र या, असे प्रतिपादन ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.
पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या पदग्रहण सोहळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
जगन्नाथ शिंदे म्हणाले की, ऑनलाइन फार्मसी जवळ जवळ बंद करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आणि आता आपण डीप डिस्काउंट सारख्या गोष्टींवर सुद्धा आळा घालू. केमिस्ट व्यावसायिकांच्या भविष्याचा अचूक वेध घेत संघटना काम करत असल्याचे त्यांनी संगितले.
यावेळी पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप पारख, सचिवपदी अनिल बेलकर, खजिनदारपदी रोहित करपे, संघटक सचिवपदी रोहित जोशी यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख अजित पारख यांच्यासह पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे तीन हजार केमिस्टच्या उपस्थित ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती झाली आहे.
नवनियुक्त अध्यक्ष संदीप पारख यांनी सर्वांचे आभार मानले. २० वर्ष या क्षेत्रात काम करत आहे, यापुढे सुद्धा चांगले काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
केमिस्ट असोसिएशन डिस्ट्रिक्ट पुणेचे सचिव अनिल बेलकर यांनी २०१८-२३ या वर्षांचा अहवाल सादर केला. कोरोना काळात पुणे जिल्ह्यात सर्वात प्रभावी काम झाल्याचे त्यांनी संगितले.
विजय पाटील आणि अनिल नावंदर यांनी केमिस्ट व्यवसायाचे बदललेले स्वरूप तसेच भविष्यामध्ये येणार्या ऑनलाइन फार्मसी आणि डीप डिस्काउंट सारख्या समस्यांची पूर्वकल्पना दिली. याचसोबत अडचणींवर मात कशी करता येईल हे सुद्धा संगितले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला.