नवी दिल्ली | मणिपूरमधील हिंसाचारावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेवरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी मणिपूर घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरलंय.
या व्हिडीओमध्ये देशाचा एक भाग जळतोय तरीही देशाचे पंतप्रधान गप्प कसे? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. मणिपूरमध्ये काय घडतंय, ते संपूर्ण देश बघतोय. परंतु पंतप्रधानांनी मणिपूरबद्दल एक शब्दही काढला नाही. देशाचा एक प्रदेश जळत असताना देशाच्या पंतप्रधानांनी काहीतरी बोलले पाहिजे. विमानाने जाऊन कमीत कमी लोकांशी चर्चा करतील, असे वाटत होते. परंतु मोदी गप्प आहेत या शब्दांत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
नरेंद्र मोदी हे आरएसएसचे पंतप्रधान आहेत त्यांना मणिपूरशी काही देणे घेणे नाही. त्यांना माहिती आहे की, त्यांच्या विचारधारेमुळेच मणिपूर जळत आहे. तेथील जनतेच्या सुख- दुःखाची काळजी मोदींना नाही. मोदींना काहीही फरक पडत नाही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते देशही जाळायला मागेपुढे पाहणार नाहीत, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. भाजप-आरएसएसच्या लोकांना काहीच वेदना होत नाही कारण ते भारताचे विभाजन करण्याचे काम करत आहेत, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले.
दरम्यान विरोधी आघाडीने INDIA (इंडिया) हे नाव निवडले. आम्ही हे नाव निवडताच नरेंद्र मोदी याला शिव्या देऊ लागले. मोदीजींना इतका अहंकार आहे की, ते INDIA या पवित्र शब्दावर टीका करत आहेत, असे सांगत काँग्रेसचे पंतप्रधान असते तर तिथेच बसले असते. मागे होऊन गेलेले कोणतेही पंतप्रधान असते तर अशी वेळ आली नसती. या परिस्थितीत पंतप्रधान कधी बोलतात, याची वाट पाहावी लागली नसती. मात्र, देशाचे पंतप्रधान मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण ते निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.