दि पूना मर्चंट्स चेंबर, हमाल पंचायतीचा दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम
पुणे । दि पूना मर्चंटस् चेंबर व हमाल पंचायत यांच्या सयुंक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या स्त्री कामगार कल्याण योजनेअंतर्गत, मार्केट यार्डात काम करणाऱ्या स्त्री कामगारांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी १४ हजार रुपयांचे बोनस वाटप करण्यात आले. महिला कामगारांचीही दिवाळी आनंदी व्हावी, या हेतूने गेल्या ३४ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.
या योजनेमार्फत गुळ-भुसार विभागातील स्त्री कामगारांसाठी आयोजित स्नेह मेळाव्यामुळे महिलांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहताना दिसला.यावेळी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या विशेष गुन्हे विभागाच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले व हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव उपस्थित होते. स्त्री कामगारांना बोनसचे वाटप पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया होते.
डॉ. बाबा आढाव यांनी स्त्री कामगार कल्याण योजनेची माहिती दिली. व्यापारी, चेंबर व कामगार यांचे सलोख्याचे संबंध आणखी दृढ व्हावेत तसेच महिला कामगारांविषयी कळकळीने काम करणाऱ्या दि पूना मर्चंटस् चेंबर व हमाल पंचायत या एकमेव संस्था असल्याचे सांगून, महिला व हमाल कामगार याच्यांसाठी अधिक योगदान देण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
स्त्री कामगार कल्याण योजनेअंतर्गत बाजारपेठेत धान्य निवडणे, झाडलोट आदी कामे करणाऱ्या सुमारे ९० महिला कामगारांना दिपावली बोनस देण्यात आला. चेंबर व हमाल पंचायतच्या सहकार्याने स्त्री कामगारांच्या कल्याणासाठी ही योजना शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय गेली ३४ वर्षे अखंडीतपणे सुरु आहे. महिलांना चेंबरमार्फत पाठबळ दिले जाते, त्यामुळे त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले. चेंबरचा हा सामाजिक उपक्रम खूप कौतुकास्पद आहे अशी भावना चोरबेले व शिंदे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, जवाहरलाल बोथरा, आशिष दुगड, दिनेश मेहता, उत्तम बाठिया, संदिप शहा स्त्री कामगार कल्याण योजना समितीचे सदस्य मुकेश छाजेड, महिपालसिंह राजपुरोहित, हमाल पंचायतचे सचिव गोरख मेंगडे, खजिनदार चंद्रकांत मानकर व हमाल पंचायत पदाधिकारी तसेच चेंबरचे सभासद उपस्थित होते. दिनेश मेहता यांनी मान्यवरांचे स्वागत केले.संदिप शहा यांनी आभार मानले. तर सुत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले.