अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत भेटीमागचं कारण सांगितलं. ओबीसी आणि मराठा समाजातील दरी वाढत असून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती आपण शरद पवार यांना केली असल्याचं यावेळी छगन भुजबळ म्हणाले.तब्बल दीड तास ही बैठक झाली.भुजबळ यांच्या या भेटीगाठीवर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याला छगन भुजबळच जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
कुणी कुणाची भेट घेतली हे मी काय सांगू शकतो? स्फोटक परिस्थिती त्यांनीच केली आहे. ओबीसी नेत्यांना हाताशी धरून कोयत्याची भाषा केली. गोरगरीब संपले पाहिजे हा छगन भुजबळ यांचा उद्देश आहे. भुजबळांना ज्यांनी मोठं केलं, त्यांनाच ते बेईमान झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्री केले. तुरुंगात जाण्यापासून वाचवले. तरी त्यांच्या मागे भिकार बोलत होते.असा हल्लाच भुजबळांवर मनोज जरांगे पाटील यांनी चढवला.शरद पवारांनी आरक्षण दिले. त्यांचाच कार्यक्रम भुजबळांनी वाजवला. छगन भुजबळ बेईमान आहेत. कुठल्याही जातीत असे लोक जन्मू नये. शरद पवार, अजित पवार आणि शिवसेना… सर्वांचाच त्यांनी गेम केला. पृथ्वीतलावर असा माणूस जन्मलाच नाही पाहिजे. जातीय तणाव करणारा, दंगली लावणारा, गोरगरीब ओबीसी आणि गोरगरीब मराठ्यात भांडण लावणारा माणूस होऊ नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.शरद पवारांनी काय विधान केले हे मी सांगू शकत नाही. मात्र सत्ताधाऱ्यांची ही चाल आहे, असं मला वाटतं. हा गेम दिसतोय मला. आजवर शरद पवारांना शह देणारा छगन भुजबळ अचानक कसा जातो? सरकारचा डाव आहे असं मला वाटतं, असा संशय जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.