मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल गुढीपाडव्यानिमित्त काहीर सभा घेतली या सभेत त्यांनी माहिम समुद्र किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाविषयीची माहिती दिली. त्यांनी या बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं त्यानंतर लगेचच रात्रीत मुंबई महापालिकेने हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले. आज सकाळपासून लगेचच या अनधिकृत बांधकाम पाडकामाला सुरुवातही झाली. आता हे काम पूर्ण झालं आहे.
आज सकाळी ८ वाजताच महापालिकेचे पथक माहिम इथं दाखल झालं आणि पाडकामाला सुरुवात झाली. माहिम येथे दर्ग्याची मजार आहे. ही मजार ६०० वर्षांपूर्वीची असल्याचा दावा इथल्या ट्रस्टने केला आहे. त्यामुळे ही मजार न हटवता फक्त तिच्या आजूबाजूचं बांधकाम हटवण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी काल झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये त्यांनी माहिम परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम होत असल्याचं दाखवलं होतं. त्या दर्ग्यावर जर एका महिन्याच्या आत कारवाई झाली नाही, तर त्याच्या बाजूला आपण गणपतीचं मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.
दरम्यान, माहिम परिसरातली सुरक्षा देखील पोलिसांनी वाढवली आहे. त्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेशही काढले. अवघ्या दोन तासांत येथील बांधकाम हटवण्यात आलं आहे.