मराठवाडा | नुकताच राज्य शासनाद्वारे गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिवाळीमध्ये देखील आनंदाचा शिधा देण्यात आला होता. परंतु पाडव्याच्या मुहूर्तावर हा शिधा जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाला असल्याने अनेक ठिकाणी हा शिधा पोहचलाच नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर मंगळवारपर्यंत मागणीच्या ५०टक्केच साठा उपलब्ध झाला होता. त्यातही तेलाचे पॅकेट नसल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरिबांचा पाडवा गोड करण्यात सरकराला सपशेल अपयशी ठरलंय.
गेल्या तीन आठवड्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु हा आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना वेळेच्या आत पोहचवण्यात मात्र उशीर झालेला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने आनंदाचा शिधा शासकीय गोडाऊनपर्यंत पोहचला नाही. तर अनेक ठिकाणी पाडव्याच्या एक दिवस आधी आनंदाचा शिधा जिल्ह्यात पोहचला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाडव्याच्या एक दिवस आधीदेखील एकाही रेशन दुकानापर्यंत हा शिधा पोहोचू शकला नव्हता. जिल्ह्यात १८०२ रेशन दुकाने असून, आनंदाच्या शिध्यास पात्र असलेले ५ लाख ६३ हजार ४१७ रेशन कार्डधारक आहेत.
विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या शिध्यामध्ये साखर, रवा आणि चणाडाळीचा समावेश असून, पामतेलाचा यात समावेश नव्हता. त्यामुळे तेलाविनाच आनंदाचा शिधा वाटप करावा लागणार आहे. मंगळवारी रात्री तेलाचे पॅकेट उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण रेशन दुकानात बुधवारी देखील तेल उपलब्ध झालं नसल्याचं चित्र आहे.
दरम्यान, दिवाळीमध्ये सरकारकडून आनंदाचा शिधा केवळ शंभर रुपयात देण्यात आला आहे. पण त्यावेळी देखील वेळेत शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे अर्धाच शिधा वाटप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्यावेळीचा अनुभव पाहता सरकराने यावेळी वेळेच्या आधीच आनंदाचा शिधा रेशन दुकानात पोहचवण्याचे नियोजन केले होते. पण याचवेळी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेले. यामुळे ठरलेले नियोजन विस्कळीत झाले आणि आनंदाचा शिधा वेळेत शासकीय गोडाऊनमध्ये पोहचलाच नाही. आता संप मिटला असून, होईल तेवढ्या लवकर आनंदाचा शिधा रेशन दुकानापर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. असे असले तरीही मात्र आनंदाच्या शिध्याचा पाडव्याचा मुहूर्त हुकला आहे.