नवी दिल्ली | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचं अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर संसदेतील शिवसेनेचं कार्यालय एकनाथ शिंदे गटाला मिळालं होतं. त्यानंतर संजय राऊत यांची मुख्य गटनेते पदावरुन हाकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती.
मुंबईत २१ फेब्रुवारीला शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यात एकमतानं ठराव करण्यात आला की, संजय राऊत हे यापुढं संसदेतील मुख्य नेते नसतील तर गजानन किर्तीकर असतील. आता आमची संख्या जास्त असल्यानं संजय राऊतांची हाकालपट्टी करण्यात यावी. शिवसेनेची ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. असं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
दरम्यान, महिन्याभरापूर्वीच संसदेतील मुख्य नेते पदावरुन राऊतांना हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. संसदेत व्हिप काढण्याचा अधिकार संजय राऊत यांना होता, पण आता गजानन किर्तीकर यांना हे सर्व अधिकार असतील. शिंदेंच्या सर्व खासदारांकडून किर्तीकरांचा या नियुक्तीबद्दल सत्कारही करण्यात आला आहे.