भारतीय फुटबॉल संघाचा दिग्गज कर्णधार सुनील छेत्री याने निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत होणारा भारत विरुद्ध कुवेत हा सामना छेत्रीच्या आयुष्यातील शेवटचा सामना असेल असं त्यानं जाहीर केलं आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत भारत विरुद्ध कुवेत हा सामना 6 जून रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर आपण फुटबॉलमधून निवृत्त होत असल्याचं सुनील छेत्री याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. छेत्रीच्या या नर्णयावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर दिग्गजांच्या प्रतिक्रिया
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या पोस्टवर विराट कोहलीने केलेली कमेंट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “भावा, तुझा अभिमान आहे” अशा आशयाची कमेंट करत विराटने छेत्रीला शुभेच्चा दिल्या आहेत. तर, विराट कोहलीशिवाय फिफा आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि बीसीसीआयसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच चाहतेही भारतीय कर्णधाराला त्याच्या निवृत्तीसाठी शुभेच्छा देत आहेत.
सुनील छेत्रीची कारकिर्द
आपल्या 20 वर्षांच्या शानदार कारकिर्दीत छेत्रीने भारतासाठी 145 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 93 गोल केलेत. सध्याच्या फुटबॉल खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोनंतर सुनील छेत्रीने सर्वाधिक गोल केले आहेत.
निवृत्ती जाहीर करताना सुनील छेत्री भावूक
निवृत्तीचा व्हिडीओ शेअर करताना सुनील छेत्री खूपच भावूक दिसून आलं. या व्हिडीओमध्ये सुनील छेत्री म्हणाला की, गेल्या 19 वर्षातील माझ्या लक्षात राहिलेल्या गोष्टी म्हणजे कर्तव्य, दबाव आणि प्रचंड आनंद. वैयक्तिकरित्या, मी कधीही विचार केला नाही की मी देशासाठी खेळलेला हा खेळ आहे, जेव्हा मी राष्ट्रीय संघासोबत प्रशिक्षण घेतो तेव्हा मी त्याचा आनंद घेतो. सुनील छेत्रीच्या या निर्णयानंतर आता जगभरातील फुटबॉल चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.