बारामतीमध्ये १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान महामेळावा पार पडला. या जनसन्मान मेळाव्यात भुजबळांना महत्वाचे मानाचे पान दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणानंतर भुजबळांचे शेवटी भाषण झाले. भाषणादरम्यान भुजबळांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली. जनसन्मान मेळाव्यात भुजबळांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. टीका केल्यानंतर लगेचच सोमवारी १५ जुलैला छगन भुजबळांनी शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक बंगल्यावर त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सर्व चर्चांना पूर्ण विराम देत छगन भुजबळांनी आपण फक्त मराठा आरक्षणाबाबतीत चर्चा केली इतर कोणत्याही राजकीय चर्चा आमच्यात झाल्या नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
छगन भुजबळांनी शरद पवार यांची घेतलेली भेट यावरून छगन भुजबळांवर प्रश्न उपस्थित केले जातायेत. या भेटीनंतर राजकीय नेते त्यांच्यावर टीका करतायेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी छगन भुजबळ यांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलं आहे. एकीकडे टीका करायची आणि नंतर भेट घायची आणि तुम्हीच मार्गदर्शन करा असं म्हणायचं ही दुटप्पी भूमिका आहे. या भेटीनंतर छगन भुजबळ हे परतीच्या मार्गावर आहेत का? असा प्रश्न मध्यमांनी विचारला असता अनिल देशमुख म्हणले की, परतीचे प्रयत्न असले तरीदेखील कुणालाही पक्ष परत घेणार नाही, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी मोठा दावा केलाय, अजित पवारांना विधानसभेत स्वतंत्र लढायला लावतील. भाजपचा काही भरोसा नाही. वेळेवर आम्हाला माघार घ्यायला लावतील, अशी अजित पवारांच्या आमदारांमध्ये चर्चा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.