बागमपेट | ”मला दररोज 2-3 किलो शिव्या मिळतात. पण परमात्म्याने माझ्यामध्ये अशी रचना केली की, या सगळ्या शिव्या माझ्यामध्ये प्रक्रिया होऊन जीवनसत्वांमध्ये रुपांतरित होतात”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे.
तेलंगणाच्या बागमपेट येथे एका कार्यक्रमात मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले, ”मी आज सकाळी दिल्लीत होतो. नंतर कर्नाटक, तमिळनाडूमध्ये होतो. रात्री आंध्र प्रदेशमध्ये असेन. आता तेलंगणामध्ये आहे. लोक मला विचारतात तुम्ही थकत नाहीत का? मी त्यांना समजावले की, मी रोज दोन-तीन किलो शिव्या खातो. पण परमात्म्याने माझ्यामध्ये अशी रचना केली आहे की, या सगळ्या शिव्या माझ्यामध्ये प्रक्रिया होऊन जीवनसत्वांमध्ये रुपांतरित होतात. एक सकारात्मक ऊर्जा तयार होते”.
दरम्यान, तेलंगणाच्या नावावर जे मोठे झाले, सत्तेत आले त्यांनीच राज्याला मागे ढकललं. तेलंगणा सरकार आणि तेलंगणामधील नेत्यांनी राज्याच्या क्षमतांवर आणि लोकांच्या कौशल्यावर अन्याय केला, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी तेलंगणामधील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.