चंद्रपूर | महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील सीमेवर एक घर आहे. आता त्याचीच चर्चा सुरु आहे. हे घर दोन राज्यात विभागलं गेलंय. त्याचा अर्धा हिस्सा महाराष्ट्रात तर दुसरा हिस्सा तेलंगणा राज्यात आहे. दोन्ही राज्यांत विभागलेल्या या घराचे किचन तेलंगणात तर बेडरूम आणि हॉल महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर महाराजगुडा गाव आहे. या गावातील 10 खोल्या असलेल्या घरात पवार कुटुंबिय राहतात. पवार कुटुंबियांच्या घराच्या चार खोल्या तेलंगणात आहेत तर इतर चार खोल्या महाराष्ट्रात येतात. किचनचा हिस्सा तेलंगणात तर त्याचा हॉल आणि बेडरूमचा हिस्सा महाराष्ट्रात आहे. पवार कुटुंबात 13 सदस्य आहेत. 10 खोल्या असलेल्या या घरात उत्तम पवार आणि चंदू पवार हे गेल्या काही वर्षांपासून राहतात.
1969 मध्ये सीमावाद सुरु झाला होता. त्यानंतर पवार कुटुंबियांच्या घर आणि जमिनीचे दोन राज्यात विभागणी झाली. त्याबाबत उत्तम पवार यांनी सांगितले की, आमचे घर महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात येते. मात्र, आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारे अडचण झाली नाही. आम्ही दोन्ही राज्यांचा मिळकत कर भरतो. त्या बदल्यात दोन्ही राज्यांच्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो.