भारतासाठी आशिया कप महत्वाचा
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून आशिया चषकाबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आशिया कपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा दोन देशांमध्ये म्हणजेच पाकिस्तान आणि श्रीलंका या देशामध्ये आशिया चषक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या स्पर्धेला 31 ऑगस्टला सुरुवात होणार असून अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. हा चषक हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळला जाणार असून पाकिस्तानमध्ये 4 सामने तर श्रीलंकेत 9 सामने खेळवले जाणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा दोन गटात होणार असून दोन्ही गटातील 2-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. सुपर-4 फेरीतील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत खेळतील अशी माहिती दिली.
यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक ही सर्व आशियाई संघांसाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघही खेळणार आहेत.
पाकिस्तान पहिल्या आशिया चषकाचे यजमान होते, पण बीसीसीआयने टीम इंडियाला तिथे पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर पीसीबीनेही आडमुठी भूमिका घेत ही स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित करण्याचा आग्रह धरला. अखेर बीसीसीआय आणि इतर क्रिकेट बोर्डांच्या दबावापुढे पीसीबीला नमते घ्यावे लागले. आता या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे असे म्हणायला हवे, पण त्यापेक्षा दुप्पट सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया चषकाचा अंतिम सामनाही श्रीलंकेत होणार आहे.
दरम्यान, आशिया कप हा भारतीय क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. यंदाचा विश्वचषक भारतातच होणार असून टीम इंडियाची तयारी कशी आहे, हे आशिया कपमधूनच कळेल. गेल्या वर्षीच्या आशिया चषकात टीम इंडियाची कामगिरी खराब होती. भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात विजेतेपदाची लढत झाली. श्रीलंकेने आशिया कप 23 धावांनी जिंकला. गेल्या वर्षी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती.