गुजरात | ऑस्कर 2023 साठी भारतीय चित्रपटांमधून ‘छेल्लो शो’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. यामुळे हा चित्रपट खूप चर्चेत आला. येत्या 14 ऑक्टोबर रोजी ‘छेल्लो शो’ हा प्रदर्शित होणारा आहे. मात्र या चित्रपटातील कलाकारासबंधी एक वाईट बातमी समोर आली आहे. ‘छेलो शो’मध्ये काम केलेला बाल कलाकार राहुल कोली याचे वयाच्या अगदी १०व्या वर्षी निधन झाले आहे. छोट्याशा राहुलला ल्यूकेमिया हा आजार झाला होता. त्यावरील उपचारासाठी त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल कोळीने 2 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
सोमवारी राहुलच्या कुटुंबीयांनी जामनगरजवळील त्यांच्या मूळगावी हापा येथे प्रार्थना सभा घेतली. “तो खूप आनंदी होता आणि 14 ऑक्टोबर नंतर आमचे आयुष्य बदलेल असे तो अनेकदा सांगायचा. पण त्याआधीच तो आम्हाला सोडून गेला,” “रविवारी त्यांने नाश्ता केला. काही वेळाने त्याला ताप आला आणि तीनदा रक्ताच्या उलट्या झाल्या. आणि तो आम्हाला सोडून गेला पण आमचं कुटुंब 14 ऑक्टोबरला त्याचा चित्रपट एकत्र पाहणार आहे”, असं राहुलचे वडील रामू कोळी म्हणाले.
राहुलचे वडिल रिक्षाचालक आहे. राहुलला तापाची लक्षणे दिसून आली, परंतु औषधोपचार करूनही तो वाचू शकला नाही. भारताने ‘छेल्लो शो’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पाठवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी केले तर चित्रपटात भाविन रबारी, भावेश श्रीमाळी, ऋचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जाणार असल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट देशभरातील 95 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता राहूलच्या निधनाने शोककळा पसरली आहे.