मुंबई | गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातला. या तीव्र सरीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नासाडी देखील मोठ्या प्रमाणात झाली. या पार्श्वभूमीवर आज (२०) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. ज्यामुळे शेतीत नुकसान झाल्यावर कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही. उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत दिली जाईल. लवकरच अशा प्रकारची सिस्टीम उभारली जाणार आहे. अशी मोठी घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.
एकूण साडेचार हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसंच कालपर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे केले जातील, तसंच आपल्याकडे पाठवल्यास लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दिड महिन्यांत सात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत पोहचली आहे. तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिले. यामुळे आता शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा सरकारकडे लागून राहिल्या आहेत.